क्र (२२८) ते तुझ्या बापाचे नोकर आहेत काय

सुंदराबाई दिवसेंदिवस शिरजोर होऊ लागली तिच्यापासून चोळाप्पा व सर्व सेवेकर्यांना अतिशय त्रास होऊ लागला एकदा एका भक्ताने श्री स्वामी समर्थांपुढे २५ रुपये ठेवले श्री स्वामींनी ते चोळाप्पास देण्यास सांगितले बाई रुपये देईना शेवटी महाराजांनी रागावून तिला दोन चार जोडे मारले तेव्हा तिने रागावून ते रुपये फेकून दिले बाई सेवेकर्यांस नेहमी म्हणे फुकटचे खातात आणि पुष्ट झाले आहेत हे ऐकून महाराज तिला म्हणाले काय गं रांडे तुझ्या बापाचे ते नोकर आहेत काय.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

दिवसेंदिवस सुंदराबाईचे श्री स्वामी दरबारात प्रस्थ वाढत गेले त्यामुळे ती शिरजोर होऊन कुणासही जुमानत नसे प्रसंगी ती श्री स्वामींवरही अधिकार गाजवून मर्यादेचे उल्लंघन करीत असे श्री स्वामी समर्थांच्या वेळी सुंदराबाई सारख्या व्यक्ती होत्या आताही आहेत याचा शोध आणि बोध हा ज्याचे त्याने घ्यावयाचा आहे असेच एकदा श्री स्वामी समर्थांच्या भक्ताने श्री स्वामींपुढे पंचवीस रुपये भक्तिभावाने ठेवले भाव भक्तीने अर्पण केलेले कोणतेही धन वस्तू अथवा अन्य काहीही भगवंत स्वीकारतो भक्ताच्या भक्तीवर तो कृपानुग्रह करतो भक्तीचे हे धन तो सेवेकर्यांस व अन्य गरजूसही हस्ते परहस्ते अथवा अन्य माध्यमातून देत असतो कारण परमेश्वर हा निर्मोही निरीच्छ कोणताही संचय न करणारा सदैव अकांचन द्रव्यरहित वावरणारा भक्तांवर सदैव कृपा करणारा असतो पण होते काय की देवाच्या आजूबाजूला सततच्या सेवेत वावरुन अथवा पूजा अर्चा करुनही अध्यात्मातला हा समर्पित भाव त्यांना कळत नाही देवापुढे येणारे ते घ्यायचे अधिक मिळविण्यासाठी झगडायचे देवाच्या सेवेपेक्षा देवापुढे ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंवरच अधिक डोळा ठेवायचा सुंदराबाई ही या वृत्तीतच आकंठ बुडालेली होती सदेह स्वरुपात वावरणार्या श्री स्वामी समर्थांसारख्या परब्रह्याचीही तिला पर्वा नव्हती सुंदराबाईस फक्त वर्तमानातला स्वार्थ समजत होता या स्वार्थाचा हावरटपणा अथवा लोभाचा अंत काय याची कल्पनाही तिला नव्हती कारण ती तिची सारासार विवेकशक्ती पूर्णतः गमावून बसली होती याची तिला पुढे जबरदस्त किंमत मोजावी लागली या संबंधात आपण याच ग्रंथात अन्यत्र बघणार आहोत निर्मोही निष्कामपणा सेवेतील समर्पितता आणि उपास्य दैवताप्रती दृढ भक्ती हे सेवेतील सूत्र कधीही विसरता कामा नये हा यातला मुख्य बोध आहे पण सुंदराबाई मात्र ते विसरली होती श्री स्वामींना ह्या अतिरेकी उद्धट माजोरी वर्तनाचा राग आल्यावर ते तिला कडक शब्दात फटकारतात काय ग रांडे ते तुझ्या बापाचे नोकर आहेत काय श्री स्वामींच्या या कडक कान उघाडणीने तिचा नाइलाज होऊन ती घेतलेले ते पैसे रागारागाने फेकून देते याचा भावार्थ असा आहे की तिच्यातला स्वार्थ लोभ अद्यापही जशाचा तसाच आहे साधारणत आपण प्रापंचिक माणसे देवभक्ती देहाने करतो कारण भक्ती करताना कोणत्याही स्वरुपाचा का होईना आपला स्वार्थ सुटलेला नसतो मनात रुजलेले षडरिपू कमी झालेले नसतात आपण करीत असलेली देवभक्ती तीर्थयात्रा पारायणे अनुष्ठाने दर्शने अभिषेक आदि सारे सारे वरकरणी असते काही तरी मागण्यासाठी अथवा इच्छापूर्तीसाठी आपला खटाटोप चाललेला असतो त्यामुळे आपली भक्ती दांभिक असते भक्ती ही अंतःकरणातून सूक्ष्म देहात झिरपत जावयास हवी त्यात निष्काम निर्मोही समर्पित शरणागत भाव असावा भक्तीत अंतर्बाह्य शुद्धता अपेक्षित असते अर्थात हे सर्व प्रयत्न साध्य निश्चितच आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Post a Comment

0 Comments